गावचा पुर्व इतिहास


महाराष्ट्रातील जी पावण तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आलेली आहेत त्या तीर्थक्षेत्रापैकी उत्तर वाहिनी कृष्णा तारी ( जिला दक्षिण गंगा म्हणून संबोधले जाते ) या ठिकाणी एक गांव वसलेले आहे ते म्हणजे सद्यस्थितीतील नागठाणे.........



              नागठाणे गावचा प्रवास हा दहाव्या शतकापासून गवळेवाडी आकराशे सत्तर ( ११७० ) पासून नागेवाडी १७ व्या शतकापासून नागठाणे असा हा गवळेवाडी, नागेवाडी, चा सर्व साधारण नऊशे ते एक हजार ( ९०० ते १००० ) वर्षाचा प्रवास.......

              विसाव्या शतकातील नागठाणे हे शहरी पावलावर पाऊल टाकट पुढे - पुढे गतिने सर्व सुविधानी युक्त असे लोकशाही पद्धतीचे सुखी समृद्ध राहनीमानाचे गाव नागठाणे............


             या गावात ब्रिटीश काळात दोन व्यक्तीमत्वे या गावास लाभले. त्यातील पहिले व्यक्तीमत्वे म्हणजे आपणा सर्वाना माहितीतील नटसम्राट बालगंधर्व.......

              बालगंधर्वाचे मुळ नावं नारायण श्रीपाद राजहंस ( कुलकर्णी ) असे होते. त्यांचा जन्म २६ जून १८८८ साली नागठाणे येथे झाला. आज ही गंधर्वाचा कुळकायद्याने गेलेला वाडा सुस्थितीत आहे. जन्म जातच गंधर्वाना लता दिदीच्या सारखा कंठ होता. त्यांचा गळा सुमधुर होता ते शिक्षणासाठी पुणे येथे गेले असता त्यांचा गायण, नाटकात कामे करणे आवडत असल्याने त्यांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून नाट्य क्षेत्र हे आपली कर्म भुमी म्हणून त्यांनी स्वीकारली विवीध नाटकांमध्ये शास्रीय गायन त्यांनी केले कालांतराने त्यांनी आपली गंधर्व नावाची नाट्य कंपनी चालू केली.

              गंधर्वाना लहान वयात लोकमान्य टिळकांनी गंधर्वाचे शास्रीय गायन व भुमिका सादरीकरण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर बालगंधर्व ही पदवी दिली तेव्हा पासून ते नारायण राजहंसाचे नटसम्राट बालगंधर्व झाले आणि तो काळ त्यांनी ३० ते ३५ नाटकांच्या माध्यमातून गाजवला त्यांनी त्यांच्या कारकिर्दिमध्ये अनेक भुमीका आजरामर केल्या त्यातील त्यांची महत्वाची म्हणजे स्री वेशातील भुमीका लोकांना थक्क करून सोडे.

             महाराष्ट्रातील अनेक गावागावात त्यांची नाटके सादर व्हायची हे सर्व कार्यक्रम तिकीटावरती असायचे परंतू नागठाणे गावातून येणाऱ्‍या गावकरी लोकांसाठी फ्री पासची सोय असायची नागठाणेमध्ये शिराळकरांच्या कट्ट्यावर गंधर्वाची नाटके चार चार दिवस सादर व्हायचे याच बरोबर किर्लोस्करवाडीचे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या विनंतीवरून सुद्धा नाटकांचे प्रयोग होत असत त्यांची गाजलेली काही नाटके " एकच प्याला " , " संयोगवर " , " शांकुतल " , " मानापमान " , " मृचकटिक " ई. अशा महान कलाकाराने नाट्य कंपनी मधून मिळवलेल्या पैशातून नागठाणे गांवचा सुपूत्र म्हणून आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ नागेश्वर मदीरा समोर मंदीरात जाणसाठी दगडी पायऱ्‍याने बांधकाम केले आहे त्या बांधकामामध्ये कोरलेल्या शिला लेखात पुढील मजकूर लिहलेला आपणास पाहावयास मिळतो तो असा " श्री नागेश्वर महाराज यांचे चरणी कै. श्रीपाद कृष्ण कुलकर्णी (राजहंस) रा. नागठाणे यांचे स्मरणार्थ चि. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी या पायऱ्‍या बांधल्या मिती कार्तिक शु॥ १५ शके १९५२ " अशा या महान कलाव्यक्तीचा मृत्यू १५ जुलै १९६७ साली पुणे येथे झाला.




नागेश्वर मंदिरा समोर बालगंधार्वानी बांधलेल्या दगडी पायऱ्या..





कोरलेल्या शिला 



              दुसरे व्यक्तीमत्व म्हणजे श्रीपाद हरी कुलकर्णी यांचा जन्म १९०२ साली जलालपूर येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. वयाच्या ५ व्या वर्षीच त्यांच्या वडीलांचे मिरज येथील मिशन हाँस्पिटल मध्ये निधन झाले. वडीलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांच्या जीवनात अपार कष्टांना सुरूवात झाली. त्यासाठी त्यांच्या आईने देखील खुप कष्ट सोसले व त्यांना सांगली येथील सिटी हायस्कुलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला. उपजतच हुशार असल्यामुळे त्यांनी बऱ्‍याच कलामध्ये व खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवले होते. शरीर तंदुरूस्त ठेवल्यामुळे त्यांनी मल्लखांब, दाडपट्टा, पोहणे, यासारख्या खेळात वर्चस्व मिळवून सुवर्णपदके देखील पटकवली होती. त्यांच्या बोलण्याचा अमोघ शक्तीमुळे समोरील व्यक्तीवर ते आपल्या विचारांची छाप पाडत....





    श्रीपाद हरी कुलकर्णी ( काका )



              वयाच्या १९ - २० व्या वर्षी महात्मा गांधीचे विचार आत्मसात करून त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशकार्याला वाहून घ्यायचे ठरविले. पारतंत्र्यात अडकलेल्या देशाला स्वतंत्र करण्याचा महात्मा गांधीच्या आव्हानाला प्रतिसाद देवून त्यांनी त्यांचे अनुयायित्व स्विकारले. विदेशी शिक्षणावर बहिष्कार घालून हायस्कुलला रामराम ठोकला आणि स्वातंत्र संग्रामात बेधडक उडी घेतली. त्यांनी मुळशी येथील सत्याग्रहात भाग घेतला, १९३० साली त्यांनी परत जंगल सत्याग्रहात समावेश घेतला. सन १९३२ मध्ये मिठाच्या सत्याग्रहात महात्मा गांधीच्या बरोबर पोलीसांच्या लाठीमारात ते जखमी झाले, प्रत्येक सत्याग्रहात ते जेलमध्ये गेले, त्यांना शिक्षा सुद्धा झाल्या तरीही ते गप्प बसले नाहीत. त्यांनी १९२४ ते १९३० पर्यतच्या काळात जिल्हा खादी प्रसारक म्हणून काम पाहिले, याच बरोबर जळगांव, भुसावळ, जामनेर, पाचोरा, मडगाव येथे सेवादलाचे संघटक म्हणून उत्कृष्ठ काम केले व इतर अनेक सत्याग्रही निर्माण केले.......

              स्वातंत्र मिळाल्यानंतर गांधीचे अपूरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दारुबंदी प्रसार समीतीमध्ये त्यांनी काम केले. तसेच कुष्ठरोग निवारण कार्यकर्ते म्हणून त्यांनी स्वच्छेने काम स्विकारले. कुष्ठरोग सेवा हीच स्वातंत्र्यानंतरची देशसेवा ही महात्मा गांधीची इच्छा पुर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गांधीचे अनुयायी विनोबा भावे यांच्या सर्वोदयाच्या कामास त्यांनी वाहून घेतले....

              देशसेवा करत असताना त्यांचा विवाह श्रीमती मीरा यांच्याबरोबर १९४३ साली झाला. त्यांना पाच मुले असली तरीही त्यांनी त्यांच्या कुटूंबापेक्षा देशसेवेतच जास्त लक्ष घातले. नागठाणे येथील १६ नागरीकांच्या समवेत त्यांनी बावची येथील सरकारी रुग्नालयात नसबंदी करून घेवून लोकांचे कामी मन परिवर्तन करून नसबंदी करण्यास प्रवृत्त केले. श्रीपाद काका अल्पशा आजाराने २६ जुलै १९७१ साली सांगली येथे मृत्यू झाला.


 


                या दोन महान व्यक्ती नागठाणे गावाने दिल्या आहेत. नागठाणे मुळ गवळेवाडीपासून चालू होते, याचा लेखी पुरावा मायाक्का चिंचणी येथील विलास हेळवी यांच्या पिढ्यान - पिढ्या चालत आलेल्या वंशावळीतून मिळतो. तो असा दहाव्या शतकामध्ये गवळेवाडी येथे बाराबलुतेदार यांचेसह रयत समाज वास्तव्य करत होता. त्या काळी २५ उंबऱ्‍यांची ही वाडी या वाडीमध्ये गुरे पालन हा व्यवसाय मुख्य असल्याने निर्माऱ्‍या दुधापासून दही, ताक, लोणी, तूप या सारखे उप पदार्थ तयार करुन आजूबाजुच्या गावामध्ये बाजारातून नेहवून विकरी करणे हा उद्योग असल्याने गवळेवाडी हे नाव पडलेले या गावामध्ये सर्व लोक गुण्या गोविंदाने नांदत होते.

               अकराव्या शतकाच्या मध्यंतरीला नागदेऊरचे ( नागपुरचे ) देशमुख नंतर कवठेमहंकाळ येथील रांजणी गावी वास्तव्यास असणारे भोसले हे ११४२ साली रांजणी येथील आपले जेष्ठ बंधू हिरोजी भोसले यांना सोडून दोन नंबरचे बोनोजी भोसले हे गवळीवाडी येथे कायमचे वास्तव्यास आले व त्यांचे दोन बंधू ऊरुण इस्लामपूर येथे व रामजी भोसले हे येडेनिपाणी येथे वास्तव्य करू लागले.


               बोनेजी भोसले यांनी गवळेवाडीचा पूर्ण अभ्यास काही वर्षात केला. नंतर गवळेवाडीची पाटीलकी असणाऱ्‍या व्यक्तीचा खून करून गवळेवाडीची सत्ता आपले हाती घेतली आणि ते स्वतः वाडीचा कारभार पाहू लागले. वाडीतील सर्व सीमेवर मार्ग शोधू लागले त्यांच्या नजरेसमोर होते की ऐन उन्हाळ्यात वाडीवरील २०० वर असणाऱ्‍या लोकांना पाण्याची टंचाई पडत असल्याचे जानवले. आणि ते पाण्याच्या शोधासाठी एक दिवस वाडी शेजारी असणाऱ्‍या झाडीमध्ये ते गेले फिरत - फिरत ते नदी काठी असण्याऱ्‍या टेकडीवर जाऊन पोहचले त्या ठिकाणी त्यांना एक ऋषी तपसाधना करत असलेले दिसले बानोजींनी त्यांचे दर्शन घेतले आणि ऋषीची विचारपूस केली....

               बानोजींना ऋषी सांगू लागले मी या गावातून चाललो असताना तहान भागवण्यासाठी मी या नदी पात्रातील पाणी प्राशन करून विश्रांतीसाठी या टाकडीवरती वस्तीसाठी काही दिवस होतो त्या दरम्यान या टेकडीवरती शंकर पार्वती मुक्कामासाठी आले होते. त्या दोघांनी ही या उत्तरेस वाहणाऱ्‍या नदीची खूप प्रशंसा केली. या नदीस त्यांनी कृष्णा म्हणून संबोधले आहे. या टेकडी परिसरात नागांचे असणारे वास्तव्य पावण करण्यासाठी त्यांनी येथे शिव लिंगाची स्थापना केली आहे. या शिव लिंगा वरती नेहमी दोन नागांची वस्ती असते. सकाळी शंकर पार्वती या दोघांनी कृष्णेच्या पात्रामध्ये उत्तर दिशेस तोँड करुन या ठिकाणी आले असता मी त्यांना नमन केले आणि त्यांनी मला शिव लिंगाची सेवा करण्याची आज्ञा दिली. तेव्हा पासून मी या ठिकाणी या नागटेकडी वरती या शिवलिंगाची पहाटे कृष्णेत आंघेळकरून उत्तर वाहिनीचे पाणी या शिवलिंगावरती घालतो आहे. या उत्तर वाहिनी कृष्णेत जो कोणी उत्तर दिशेस तोंडकरुन पाण्यामध्ये डुबकी मारेल, त्याचे पातक नाहीसे होईल या गोष्टीचा तु प्रसार कर असा अशिर्वाद देवून शंकर पार्वती या ठिकाणाहून लुप्त झाले....

              हे ऋषींचे बोलणे ऐकल्यानंर बानोजी आपली व्यथा ऋषींना सांगितली, त्यावर ऋषी म्हणाले या कृष्णेचे पाणी कधीही उन्हाळ्यात आटलेले नाही, मी गेली कित्येक वर्षे पाहत आहे, आपण या नागटेकडीच्या बाजूस राहण्यासाठी यावे हे ऐकून बानोजींनी सुद्धा मनोमनी या भागात रहाणेचे ठरवले आणि ते गवळीवाडीत परत आले व वाडीतील लोंकांची बैठक घेवून त्यांना सर्व हकिकत सांगून गवळीवाडीतील पांठरी मातीसारखीच माती या टेकडी व परिसरात असल्याचे हीत त्यांनी नमुद करून सर्वानी माझ्याबरोबर या नागटेकडीकडे वास्तव्यास यावे असे सांगितले व काही महिन्यातच नागटेकडी शेजारी वस्ती निर्माण झाली. याच गवळेवाडीतील दोन कुटुंबे गवळेवाडीच्या उत्तर दिशेस असणाऱ्‍या खोलभागात आपल्या जमिनीमध्ये राहण्यास गेले. नागटेकडी व खोलभाग यांचे मधोमध दोन कुटुंबे नदिच्या किणारी वास्तव्य करु लागले. कालांतराने ही दोन कुटुंबे नागटेकडी येथे राहण्यास गेली मात्र खोलभागातील कुटुंबे कायमस्वरुपी या खोल भागातच राहु लागल्याने खोल भागावरुन खोले असे त्यांचे आडनांव झाले व आडनांवरून त्यांच्या वस्तीचे खोलेवाडी असे नाव पडले अलिकडेच या वाडीचे सुर्यगांव असे नाव अस्थीत्वात आहे......

              नागटेकडी वरती राहण्यास आलेल्या बानोजी भोसले आता पाटील झाले होते. त्यांना आपल्या मुळ गांवचे नांव नागदेऊर आणि नागटेकडी या शिंवलिंगा भोवती वास्तव्यास गवळेवाडी येथे वास्तव्य असणाऱ्‍या भागात आजही पांढरी या नावाने ओळखले जाते. याच नागेवाडीत अनेक पिढ्या गावचा मुळ इतिहास आपल्या पुढच्या पिढीस सांगत कालवश झाल्या आहेत....

               नागेवाडीचे नामांतर सतराव्या शतकात नागठाणे असे झाले. या नागठाणेचे महात्म्य आसपासच्या शहरापर्यत पोहचले हेते. तासगांव शहराच्या राणीसाहेब सावित्रीबाई पटवर्धन उत्तर वाहिनी नदीमध्ये अंधोळ करुन पुण्य मिळवण्यासाठी आल्या त्यांनी या नदीमध्ये स्नान केले व तासगांव येथे नागठाणेचे त्यावेळचे कारभारी यांना तासगांव येथे बोलावून घेवून उत्तर वाहिनी कृष्णा तीरी भव्य उत्तरेश्वर महाराज यांचे चरणी घाट बांधण्याची आपली कल्पना सांगितली. नागठाणेकरांची मान्यता मिळताच काही कालावधीमध्ये घाट बांधकामासाठी लागणारे साहित्य या कृष्णातीरी येवून पडले. आणि शेपाचशे लोक या घाटाचे काम करू लागले. या घाटाची रचना नागेश्वर मंदीरातून भूयारी मार्गाने कृष्णानदीमध्ये असणाऱ्‍या डोहातील मंदिरात नंदी, नदीसमोर शिवलिंग, शिवलिंगाच्या सभोवती सात स्मृती, सात मृतीच्यावर छत्री, छत्रीच्या पुढील बाजुस जलकुंड, जलकुंडातून घाटाची सुरुवात, जलकुंडात जादा होणारे पाणी निघून जान्यासाठि भव्य गोमूख, गोमुखातून निघनारे पाणी मंदीरापासून दूर नेण्यासाठी साखळी, ऐन पावसाळ्यात देखील भुयारि मार्गाने या मंदीरामध्ये पूजा होणेसाठी शिसव या धातूने या मंदीराचे व घाटाचे बांधकाम रचनेनुसार पाचव्या पायरीपर्यत आले आणि या पायरीमध्ये बरोबर मध्यभागी " श्री उत्तरेश्वर महाराज चरणी सावित्रीबाई पटवर्धन तासगांवकर निरंतर शालीवाहक शके ॥ १७४६ सुश्रानुनाम सवत्सरे ॥ " अशी अऱ्‍याची शिला बसवण्यात आली आहे, हे नागठाणेकर कारभारी व गावकरी यांना पसंत न पडल्याने त्यांनी घाटाचे काम थांबवले. तासगांवकर पटवर्धन राणीसाहेबांनी गावकऱ्‍यांची समजूत घालण्याची खूप प्रयत्न केला परुंतू, नागठाणेचे कारभारी यांना मान्य नसल्याने अखेर राणी साहेबांनी झालेले घाटाचे काम तसेच अर्धवय सोडून भिलवडी येथे दक्षिण वाहिनी कृष्णा तारी साहित्य हलवून घाटाचे काम पूर्ण करूण घेतले. आजही आपणास हा घाट भिलवडी येथे दिमाखात उभा असलेला पहावयास मिळतो आहे....

              या घाटाचे अवशेष उखरून गावकरी मंडळींनी नागठाणे येथे कृष्णा तीरी नाईकबा मंदिराचे काम पुर्ण केले आहे. या मंदीराचा पाट भिँतीला राणी साहेबांच्या नावाची शिला लेख कोरलेला घाटाचा तो दगड लावण्यात आला आहे....

               अश्या या पुरातन गवळेवाडी ( नागठाणे ) लोकसंख्या १५,००० आणि खोलेवाडी ( सुर्यगांव ) लोकसंख्या १,७०० इतकी असून सुर्यगांवमध्ये फक्त काळंबा देवीचे मंदीर असून बाकी सर्व मंदिरे नागठाणे येथे आहेत. सुर्यगांवचे सर्व लोक नागठाणे येथे देवाचे दर्शनासाठी येतात व नागठाणेचे सर्व लोक देवीच्या दर्शनासाठी सुर्यगांव येथे जातात..........


 


      असा हा गवळेवाडीचा पुर्व इतिहास.........!!




No comments:

Post a Comment